
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येतील तसे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण तापायला लागले असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करावयाच्या गोळा बेरजेच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात हालचाली वेगावल्या आहेत. गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक या दोन संस्था म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू समजल्या जातात त्यामुळे त्या आपल्या ताब्यात असणे प्रत्येक राजकीय पक्ष आणि आघाडीला महत्त्वाचे वाटते.
गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष पदाची मुदत मेअखेरीस संपत असल्यामुळे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा याबद्दलचा निरोप त्यांच्या गटाच्या कारभाऱ्यांच्याकडून त्यांना देण्यात आल्याचे समजले होते मात्र अरुण डोंगळे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत नव्हते त्याऐवजी ते बंडखोरी करण्याच्या भूमिकेत आहेत.
दरम्यान अरुण डोंगळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साजरा असून शिंदे यांच्या सूचनेनुसार अरुण डोंगळे हे सध्या तरी राजीनामा देणार नाहीत यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
डोंगळे यांनी शिंदे गटाशी संधान बांधल्यास त्याचा परिणाम फक्त गोकुळवरच नव्हे तर येणाऱ्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सुद्धा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. डोंगळे यांची पुढची वाटचाल काय असेल यावर चित्र लवकरच स्पष्ट होईल.