
कोल्हापूर, दि. २४ जून २०२५: संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान, कोल्हापूर यांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त (२६ जून) कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय स्थानिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना भेटून हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शाहू महाराज हे सामाजिक समता, शिक्षण आणि प्रगतिशील विचारांचे प्रतीक असून, त्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आणि सामाजिक सुधारणांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या या थोर समाजसुधारकाच्या जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर झाल्यास त्यांच्या कार्याचा गौरव होईल आणि सामाजिक एकतेला बळकटी मिळेल.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जाहीर होणाऱ्या तीन शासकीय स्थानिक सुट्ट्यांमध्ये शाहू महाराज जयंतीचा समावेश नाही. सुट्टी जाहीर झाल्यास हा दिन लोकोत्सवाच्या स्वरूपात साजरा होऊ शकेल आणि सामाजिक समतेचा संदेश घरोघरी पोहोचेल, असे परिषदेचे म्हणणे आहे.
संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान ने जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
यावेळी निलेश बनसोडे, प्रविण बनसोडे, अमित नागटिळे, रोहन वाघमारे, सुरज लोखंडे, अतिष माने आदि उपस्थित होते, आधी पदाधिकारी उपस्थित होते.